कॉलेज व क्लासमध्ये ११ वी १२ वी सायन्सचे विषय इंग्लिशमधून शिकत असूनही गेल्या ३ दिवसांत (२,३ व ४ डिसेंबर २०१९) ३८७ विद्यार्थ्यांनी NEET चा परीक्षा अर्ज भरताना languge चा पर्याय निवडताना Marathi हा पर्याय निवडला.
आता या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेच्या वेळी दोन भाषेतील प्रश्नपत्रिका मिळेल. प्रश्नपत्रिकेत दोन स्तंभ (कॉलम) असतील. एका स्तंभात इंग्लिश प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नासमोर दुसऱ्या स्तंभात मराठी प्रश्न असेल. हे महाराष्ट्रातील विद्यार्थी पूर्ण शिक्षण इंग्लिशमधून घेत असले तरी महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी मराठी भाषक आहेत. त्यांना NEET परीक्षेत जो प्रश्न इंग्लिशमधून नीटपणे समजणार नाही त्याचे उत्तर देताना ते अडखळतील किंवा चुकूही शकतील.
अशा नीट न कळलेल्या इंग्लिश प्रश्नाचे गुण त्यांना गमवावेच लागतील. अशा नीट न कळलेल्या इंग्लिश प्रश्नाचे मराठी रूपांतर समोरच दिसले तर ते मराठी रूपांतर वाचून त्या प्रश्नाचे नेमके व अचूक उत्तर देण्याची शक्यता तो प्रश्न मराठीतून वाचल्यावर वाढू शकते !
अधिक अचूक उत्तराची शक्यता मराठीमुळे कशी वाढते ते आपण पाहू !
इंग्लिशमधील आर्टिकल a चे उदाहरण पाहू !
इंग्लिशमध्ये a ने कधी एक (१) ही संख्या दर्शवली जाते तर कधी a ने अनेक प्रकारातील एखादा, एखादी, एखादे दर्शवले जाते.
तसेच the चेही आहे. the ने कधी एकचएकपणा किंवा एकमेवत्व किंवा सर्वोच्चस्थान दर्शवले जाते तसेच the कधीकधी केवळ इंग्लिश वाक्यरचनेच्या पद्धतीचा भाग म्हणून अवतरतो व त्या the ला विशिष्ट अर्थ नसतो !
at हा शब्द कधी वेळ दर्शवतो तर कधी ठिकाण तर कधी भावना दर्शवतो.
a, the, at यासारखेच विविध अर्थछटा असलेले at least, least, most, mostly, exact, exactly, at most, utmost, on, upon हे इंग्लिश शब्द त्यांच्या अर्थछटांनुसार प्रश्नाचा अर्थ व रोख बदलतात.
a च्या निव्वळ एक (१) किंवा एखादे (अनेकांपैकी एक) या दोन अर्थछटा इंग्लिश प्रश्नामध्ये असल्या तरी त्या प्रश्नाच्या मराठी रूपांतरात मात्र संख्येसाठी एक हा शब्द तर अनेकापैकी एक यासाठी एखादा, एखादी, एखादे असा शब्द योजलेला असेल. इंग्लिश प्रश्नातील a ची अर्थछटा विद्यार्थ्यांना काही काळ विचार करून संदर्भानुसार जाणून घ्यावी लागेल पण त्याच प्रश्नाच्या मराठी रूपांतरात नेमकी अर्थछटा प्रश्न वाचतानाच स्पष्टपणे कळेल.
NEET परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी मिळणाऱ्या अगदी कमी वेळात इंग्लिश प्रश्नातील a ची अर्थछटा शोधायची व जाणून घ्यायची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच असेल पण मराठी प्रश्न मात्र ही अर्थछटा सहज लक्षात आणून देईल.
शेकडो इंग्लिश शब्दांच्या अर्थछटा आपणच तर्काने शोधत बसायचे का मराठी या ज्ञानभाषेतून त्यातील नेमकी अर्थछटा सहज समजण्याची सोय स्वतःच स्वतःसाठी करून घ्यायची हे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवावे.
NEET चा अर्ज भरताना प्रत्येकाने language पर्याय निवडताना Marathi हा पर्याय निवडावा, इंग्लिश प्रश्नातील अनेक शब्दांच्या अर्थछटा शोधण्याचा स्वतःवरचा ताण कमी करावा आणि योग्य अर्थछटा समजण्यासाठी इंग्लिश प्रश्नासमोरचा मराठी प्रश्न वाचावा असे मी सुचवतो.
मराठी या ज्ञानभाषेकडून मिळणारा हा लाभ (वरदानच म्हणा) सर्वांनी अवश्य घ्यावा.
NEET चा अर्ज भरताना महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थ्याने language हा पर्याय निवडताना english हा पर्याय निवडू नये कारण तसे केले तर फक्त इंग्लिश प्रश्नपत्रिका मिळेल आणि अनेक अर्थछटा जाणून घेण्याचा ताण स्वतःवरच येईल मात्र प्रत्येकाने language हा पर्याय निवडताना marathi हा पर्याय निवडला तर अनेक इंग्लिश शब्दांची नेमकी अर्थछटा ज्ञानभाषा मराठीच्या कृपेने सहज लक्षात येईल.
चला तर मग …..
language हा पर्याय निवडताना marathi निवडा आणि अपेक्षेहून मोठे यश मिळवा. NEET परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा !
ज्यांचा NEET अर्ज भरून झाला असेल व त्यांनी language पर्याय English निवडला असेल आणि नंतर वरील माहिती कळाली त्यांना अर्ज edit करून language पर्याय मराठी असा बदलून घेता येईल.
आपला शुभचिंतक
अनिल गोरे (मराठीकाका) ९४२२००१६७१
*NEET च्या मराठी – इंग्लिश संयुक्त प्रश्नपत्रिकेचा नमुना खाली दिला आहे. तो अवश्य पहावा.*
[pdf-embedder url=”http://saninnovations-002-site10.atempurl.com/wp-content/uploads/2019/12/MarathiAA.pdf”]
ही नमुना प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
[pdf-embedder url=”http://saninnovations-002-site10.atempurl.com/wp-content/uploads/2019/12/keyAA.pdf”]
हा नमुना संच डाउनलोड करा